लॉकडाउनमुळे अभिनेता तब्बल 1400 KM प्रवास करत पोहोचला घरी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमुळे अनेक छोटे-मोठे कलाकार बेरोजगार झाले आहेत. अशीच अवस्था अभिनेता करण खंडेलवाल याची झाली आहे. आर्थिक टंचाईमुळे त्रस्त असलेल्या करणने मुंबई सोडून थेट केरळमधील गाव गाठले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे करण तब्बल 1 हजार 400 किलोमीटर गाडी चालवत गावी पोहोचला.

करण खंडेलवाल छोट्या पडद्यावरील एक नामांकित अभिनेता आहे. ‘साथ निभाना साथिया’ या मालिकेमुळे तो प्रसिद्ध झाला होता. कोरोनामुळे तो आर्थिक संकटात सापडला आहे. लॉकडाउनमुळे माझे काही प्रोजेक्ट बंद करण्यात आले. त्या प्रोजेक्टचे पैसेही मला अद्याप मिळालेले नाहीत. पैशांअभावी मुंबईमध्ये दिर्घकाळ राहणे मला शक्य नव्हते. परिणामी मी काही काळासाठी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. 1 हजार 400 किलोमीटर गाडी चालवत मी केरळमध्ये माझ्या गावी पोहोचलो असल्याचे करणने सांगितले.

दरम्यान, लॉकडाउनमुळे ठप्प झालेला मनोरंजन उद्योग आता हळूहळू सुरु होत आहे. सरकारने नियमांचे पालन करुन शूटिंग करण्यास परवानगी दिली आहे. परिणामी काही मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण आता सुरु करण्यात आले आहे. मात्र अनेक मालिका लॉकडाउनच्या काळात आर्थिक टंचाईमुळे रातोरात बंद करण्यात आल्या. या मालिकांमधील कलाकार आता नव्या प्रकल्पांच्या शोधात आहेत.