तब्बल १४ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया वर आली ‘ही’ वेळ 

सिडनी : वृत्तसंस्था – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील क्रिकेट मालिकेत यंदा प्रथमच भारताने वर्चस्व गाजविले असून सिडनी कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन दिला आहे. तब्बल १४ वर्षानंतर फॉलो ऑन स्वीकारण्याची ऑस्ट्रेलियावर पाळी आली आहे. याअगोदर इंग्लडमध्ये २००५ मध्ये झालेल्या अ‍ॅशे मालिकेतील चौथ्या कसोटीत इंग्लडने ऑस्ट्रेलियाला फॉलो ऑन दिला होता. त्यानंतर आता सिडनी कसोटी भारताने तब्बल ३२२ धावांची आघाडी घेत फॉलो ऑन दिला आहे. पावसाने व्यत्यय आलेल्या या कसोटीत  ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात आला. कुलदीप यादव याने पाच बळी घेऊन महत्वाचा वाटा उचलला.

पावसाच्या व्यत्ययानंतर रविवारी खेळास सुरुवात झाल्यावर मोहम्मद शमीने पॅट कमिन्सची (२५) विकेट काढत ऑस्ट्रेलियाला सातवा धक्का दिला. त्यानंतर जसप्रीत बुमराने पीटर हँडस्कोंबला (३७)  माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का दिला. पाठोपाठ कुलदीप यादवने नाथन लायनची विकेट काढत  ऑस्ट्रेलियाला अडचणीत आणले. मात्र मिचेल स्टार्क ( नाबाद २९) आणि जोस हेझलवूड ( २१) यांनी शेवटच्या विकेटसाठी चिवट फलंदाजी करत संघाला ३०० पार मजल मारून दिली. अखेरीस कुलदीप यादवने हेझलवूडची विकेट काढून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला. भारताकडून कुलदीप यादवने ५, जडेजा आणि शमीने प्रत्येकी दोन तर बुमराने एक गडी टिपला.

यापूर्वी २१ जुलै ते १२ सप्टेंबर २००५ मध्ये इंग्लड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या झालेल्या ५ कसोटी मालिका इंग्लडने २-१ अशी जिंकली होती. या मालिकेत २५ ते २८ ऑगस्ट २००४ दरम्यान झालेल्या चौथ्या कसोटीत इंग्लडने ऑस्ट्रेलिया फॉलो ऑन दिला होता. प्रथम फलंदाजी करीत इंग्लडने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. इंग्लडने २५९ धावांची आघाडी घेत ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. दुसऱ्या डावात मात्र ऑस्ट्रेलियाने स्वत: ला सावरत ३८७ धावा केल्या. इंग्लडपुढे १२९ धावांचे आव्हान होते. पण या १२९ धावा करताना त्यांना आपले ७ गडी गमवावे लागले. शेवटी ३ गडी राखून या कसोटीत स्ट्रेलियावर इंग्लडने मात केली होती.

या कसोटीनंतर आता तब्बल १४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला तब्बल ३२२ धावांची पिछाडी घेत फॉलोऑन स्वीकारण्याची पाळी आली आहे. मेलबॉर्न येथील बॉक्सिंग डे कसोटीतही भारताने २९२ धावांची आघाडी घेतली होती. पण, त्यावेळी भारतीय कर्णधार विराट कोहली याने फॉलो ऑन न देण्याचा निर्णय घेतला. कारण, एक तर गोलंदाज दमलेले होते. शिवाय शेवटच्या दिवशी खेळपट्टी खूप खराब होण्याची शक्यता असल्याने तेव्हा चौथ्या डावात फलंदाजी करणे खूप अवघड गेले असत. म्हणून त्याने फॉलो ऑन न देता दुसरा डाव सुरु केला होता.