7 वर्षांनी अमित शहा यांचे ‘बोल’ ठरले ‘खरे’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज ज्याप्रमाणे सीबीआय पी चिंदबरम यांच्या मागे लागली होती तशीच काहीशी परिस्थिती गुजरातचे गृहमंत्री अमित शहा यांची २०१० मध्ये झाली होती. सोहराबुद्दीन शेख बनावट चकमकीत अमित शहा यांना सीबीआयने २५ जुलै २०१० मध्ये अटक केली होती. अटक केल्यानंतर तब्बल दोन वर्षे त्यांना गुजरातमध्ये प्रवेश करण्यास बंदी होती. दोन वर्षांनी ही बंदी उठल्यावर २०१२ मध्ये अमित शहा हे गुजरातमध्ये पुन्हा परतले होते, तेव्हा त्यांनी एक शेर सांगितला. त्याचा अर्थ असा ‘‘ मेरा पानी उतरते देख, किनारे पर घर मत बना लो मै समुंदर हूॅ, लौट कर जरुर आऊंगा.”

तेव्हा पी. चिंदबरम यांचे दिवस होते. पण अमित शहाही कच्च्या गुरुचे चेले नव्हते. त्यांनी त्याही परिस्थितीशी सामना करुन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत वाटचाल केली. आपल्या रणनितीने भाजपाला अनेक राज्यात तसेच देशात सत्तास्थानी बसविण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आता दुसऱ्या टर्ममध्ये ते देशातील दुसऱ्या क्रमांकांचे शक्तीशाली नेते झाले आहेत. २०१२ मध्ये राजकारणात चारी बाजूने बदनामी सहन करावी लागलेल्या अमित शहा यांनी तेव्हा काढलेले बोल आज खरे करुन दाखविले आहेत.