अँम्ब्युलन्स हेल्प रायडरचा पुण्यापाठोपाठ आता औरंगाबादमध्येही ग्रुप

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

गर्दीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट करुन देण्यासाठी अँम्ब्युलन्स हेल्प रायडर ग्रुप २४ मे रोजी पुण्यात स्थापन करण्यात आला. अवघ्या ७ ते ८ दिवसात या ग्रुपमध्ये ८०० युवक, युवती सहभागी झाले. पुण्यातील युवकांचा मदतकार्यामधील उत्साही सहभाग पाहून औरंगाबादमधील काही युवकांनीही पुढाकार घेऊन तिथे अँम्ब्युलन्स हेल्प रायडर ग्रुप स्थापन केला आहे.

पुण्यातील ग्रुप समन्वयक प्रशांत कनोजिया यांनी ‘पोलीसनामा’शी बोलताना सांगितले की कोल्हापुरात एका गंभीर जखमी मुलाला घेऊन जाणारी रुग्णवाहिका गर्दीत अडकल्यामुळे त्या दहा वर्षीय मुलाला जीव गमवावा लागला होता. रुग्णवाहिकेतील रुग्णासाठी प्रत्येक क्षण महत्वाचा असतो. परंतु वाढत्या वाहतुकीमुळे रुग्णवाहिकाही त्या कोंडीत अडकतात. कोल्हापूर येथे घडलेल्या दुर्दैवी प्रसंगासारखे प्रसंग सर्वत्र घडतात. हे प्रसंग टाळण्यासाठी हेल्प रायडर ग्रुप ही संकल्पना तरुणांनी उचलून धरली. सावरकर जयंतीच्या दिवशी पुण्यात कर्वे रस्त्यावर खंडुजीबाबा चौकात वाहतूक कोंडीत अशीच एक रुग्णवाहिका अडली होती. हेल्प रायडर ग्रुपच्या एका सदस्याला ही माहिती मिळताक्षणी त्याने त्या वाहतूक कोंडीत जाऊन त्या रुग्णवाहिकेला नियोजित हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मार्गावरून वेळेवर पोहोचवण्यात मदत केली. अशा तीन, चार प्रसंगी या हेल्प रायडर ग्रुपची रुग्णवाहिकेची कोंडीतून सुटका होण्यास मदत झाली आहे. पुण्यात या संकल्पनेला वाहतूक पोलीसांचे सहकार्य मिळाले आहे. ग्रुप सदस्याच्या बाईक अथवा कारवर स्टिकर्स, झेंडे लावण्यात आले आहेत त्यामुळे मदत करताना त्यांना कोणत्याही अडचणी येत नाहीत.

हेल्प रायडर्सचा एक व्हॉट्सऍप ग्रुप करण्यात आला आहे त्यावर मदतीसाठी एकमेकांना संदेश दिले जातात. जखमींना प्रथमोपचार देण्यासाठीचे प्रशिक्षण या रायडर्सना दिले जाणार आहे.