‘धनंजय मुंडे, महेबुब शेखनंतर आता संजय राठोड प्रकरणीही का होत नाही कारवाई ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – पूजा चव्हाण या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केले असून त्यांनी बेहिशोबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. पती विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये पूजा चव्हाण प्रकरणात अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार मंत्र्यांवरील व पक्षातील नेत्यांवर असलेल्या आरोपांची प्रकरणं दाबत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, धनंजय मुंडे यांच्यावर अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही, एका मंत्र्याच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणात पकडण्यात आले, त्यांच्यावर देखील कोणतीच कारवाई झाली नाही. एका मंत्र्यांने कार्यकर्त्याला घरी जाऊन मारले, त्याच्यावर ही कारवाई नाही, एका पक्षाच्या युवक अध्यक्षावर बलात्काराचा आरोप असुन देखील कोणतीच कारवाई नाही. परंतु, पूजा चव्हाण प्रकरणात आवाज उठवणाऱ्या चित्रा वाघ यांच्या पती विरोधात आत्ताच चौकशी का सुरु होतेय, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

भाजप चित्रा वाघ यांच्या पाठिशी
चंद्रकांत पाटील म्हणाले, पक्षाच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर अशाप्रकारची कारवाई केल्याने आम्ही घाबरणार नाही. चित्रा वाघ या वाघीण आहेत, भाजपा पक्ष पूर्णपणे त्यांच्या पाठिशी असल्याचे, पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

काय आहे प्रकरण ?
चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ हे मुंबईतील परेल येथील गांधी स्मारक रुग्णालयात वैद्यकीय अभिलेख ग्रंथपाल या पदावर कार्यरत होते. 5 जुलै 2016 रोजी एका प्रकरणात 4 लाख रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधित किशोर वाघ यांच्या संपत्तीची खुली चौकशी लावण्यात आली होती. या तपासात किशोर वाघ यांच्याकडे एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेची अपसंपदा आढळून आली. या खुल्या चौकशीच्या अहवालानुसार प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ जगताप यांच्या तक्रारीवरुन किशोर वाघ विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये 12(2) आणि 13(1)E या कलमांतर्गत 12 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला.