मारुती सुझुकीनंतर आता ‘ही’ मोठी कंपनीही करणार डिझेल कारचे उत्पादन बंद ; वाहनप्रेमींमध्ये खळबळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वांत मोठ्या कारनिर्मिती उत्पादक मारुती सुझुकीने येत्या वर्षभरात डिझेलवरील कारचे उत्पादन बंद करणार असल्याची घोषणा केली. त्यांनतर आता टाटा मोटर्सनेदेखील आपल्या लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. १ एप्रिल २०२० पासून टाटा मोटर्सही डिझेलच्या कारचे उत्पादन बंद करेल. यामुळे वाहनप्रेमींसह उद्योगविश्वामध्ये खळबळ उडाली आहे.

टाटा मोटर्सचे वाहन विभागाचे अध्यक्ष मयांक पारेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या निकषांनुसार डिझेल कारची निर्मिती करणे खर्चिक होणार असल्याचे सांगितले. BS-VI एमिशन निकष लागू झाल्यानंतर लहान डिझेल कारचा उत्पादन खर्च वाढण्याची शक्यता आहे. या वाढीव खर्चाचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे. त्यामुळे कारची किंमत महाग झाल्यानंतर विक्रीतही घट होण्याची भीती आहे. तसेच छोट्या आणि मध्यम आकाराच्या डिझेल इंजिनच्या कारची मागणी कमी झाली आहे. यामुळे नवीन इंजिन विकसित करण्यासाठीचा खर्च मोठा असणार आहे. त्यामुळे लहान डिझेल कारचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बीएस-६ मानक लागू झाल्यानंतर डिझेलच्या छोट्या तसेच मध्यम कार महाग होतील. भारतात १ एप्रिल २०२० पासून बीएस-६ प्रदूषण मानक लागू होत आहे. यामुळे अनेक कंपन्यांच्या डिझेल वाहनांमध्ये काही बदल करावे लागणार आहेत.