मनसुख हिरेन प्रकरण : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर गृहमंत्र्यांनी निर्णय बदलला, फडणवीसांचा आरोप (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकानं भरलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाचे तीव्र पडसाद आज (मंगळवार) विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर ठाकरे सरकारला चांगलेच धारेवर धरलं. मनसुख हिरेन यांची हत्या सचिन वाझे यांनी केल्याचे हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या जबाबात म्हटल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करून अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली.

फडणवीस यांनी सांगितले की, वाझेंना हटवण्याचं गृहमंत्र्यांनी अध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत कबूल केलं. मात्र, नंतर मुख्यमंत्र्यांशी झालेल्या भेटीनंतर त्यांनी निर्णय बदलल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना केला. सरकार वाझेंना का पाठीशी घालत आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विधानसभेचं कामकाज संपल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

फडणवीस पुढे म्हणाले, सचिन वाझे यांना अटक झाली तर सरकारमधील कोणाकाेणाची नावे समोर येतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकार सचिन वाझेला पाठीशी घालत असून, सचिन वाझे हा अधिकारी सभागृहापेक्षा मोठा आहे का ? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच विरोधी पक्षनेत्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही घाबरणाऱ्यातले नाही. सत्य बाहेर आणल्याशिवाय मी राहणार नाही, असे फडणवीस यांनी ठामपणे सांगितले.

जबाबातून धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या
मनसुख हिरेन यांच्या पत्नीने दिलेला जबाब मी आज सभागृहात वाचून दाखवला. यामधून अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या आहेत. मनसुख हिरेन यांची जी गाडी स्फोटक ठेवून, घटनेकरिता वापरण्यात आली होती. ती गाडी नोव्हेंबरपासून 5 फेब्रुवारीपर्यंत सचिन वाझे वापरत होते, असं स्पष्टपणे त्यांच्या पत्नीने सांगितले. एवढेच नाही तर त्यांचा तपास हा केवळ सचिन वाझे यांनी केला. तीन दिवस हिरेन हे वाझे सोबत सकाळी जायचे व रात्री यायचे, हेदेखील हिरेन यांच्या पत्नीने जबाबात म्हटले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.