वायुसेनेला ‘अपाचे-राफेल’ मिळाल्यानंतर नौदलाला मिळणार ‘सबमरीन’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय नौदलाचे सामर्थ्य अधिक वाढले आहे. भारतीय नौदल आधुनिकीकरणाच्या अनेक टप्प्यातून जात आहे. शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्सनंतर आता नवीन पाणबुडी लष्करात दाखल होणार आहे. आयएनएस खंदेरी असे या पाणबुडीचे नाव आहे.

प्रोजेक्ट 75 अंतर्गत कलवरी वर्गाची पाणबुडी सामील करण्यात येणार आहे. ही पाणबुडी 28 सप्टेंबरला नौदलात दाखल होणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये होईल. कलवरी वर्गाची ही डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी आल्यानंतर नौदलाच्या सामर्थ्यात लक्षणीय वाढ होणार आहे.

नौदलाच्या क्षमतेत दुपटीने वाढ करणाऱ्या तसेच सागरी युद्धातील महत्त्वाचा दुवा ठरू शकणारी स्कॉर्पिन वर्गातील ही पाणबुडी फ़्रांसच्या डीसीएनएस मदतीने माझगाव डॉकयार्डमध्ये तयार होत आहे. भारतीय नौदलात एकूण इलेक्ट्रिक 6 पाणबुड्या होतील. ह्या 6 पैकी एक असणारी कलवरी वर्गातील दुसरी पाणबुडी आयएनएस खांदेरी 2017 मध्ये नौदलात सामील झाली आहे.

सी मालिकेची तिसरी पाणबुडी आयएनएस करंज यापूर्वीच चाचणीसाठी समुद्रात गेली आहे. 2022-2023 पर्यंत आणखी 4 डिझेल इलेक्ट्रिक कलवारी पाणबुडी भारतीय नौदलात सामील होण्याची शक्यता आहे. भारतीय नौदलाकडे सध्या 16 पाणबुड्या आहेत. ज्यामध्ये 2 अणु पाणबुड्या आयएनएस चक्र आणि आयएनएस अरिहंत आहेत.

पाणबुडीची वैशिष्ट्ये
कलवरी वर्गातील पाणबुडीमध्ये शस्त्र प्रक्षेपण ट्यूब असून ती पाणबुडी शस्त्रेही वाहून नेऊ शकते ही पाणबुडी 6 x 533 मिमी टॉर्पेडो ट्यूबने सुसज्ज आहे ज्यात 18 अँटी-शिप मिसाईल लोड केल्या जाऊ शकतात. या पाणबुडीत अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा आणि उत्तम संपर्क यंत्रणा असून जमिनीवर मारा करणे, प्रतिस्पर्धी पाणबुडीशी लढा देणे, गोपनीय माहिती जमवणे आदी बाबींसाठी विशेषत ही पाणबुडी ओळखली जाते.

बॅटरी चार्ज करण्यासाठी प्रत्येक दोन दिवसांनी डिझेल इलेक्ट्रिक पाणबुडी पृष्ठभागाजवळ येणे आवश्यक असते आणि फक्त 4-5 तासात बॅटरी चार्ज होते. त्यानंतर पाणबुडी पुन्हा खोल समुद्रात जाते. विशेष म्हणजे की समुद्राच्या 30 मीटर खोलीपर्यंत पोहोचल्यानंतर या पाणबुडीला शोधणे कठीण आहे. ही पाणबुडी जास्तीत जास्त 350 मीटरपर्यंत समुद्रात डुबकी मारू शकते.