‘आरएसएस’ (RSS) सत्तेत येणार नाही हाच ‘अजेंडा’ : ॲड. आंबेडकर

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे नेते घाबरलेले असून आता ते सत्तेत येणार नाहीत. पुढील निवडणुकीत शंभर जागांवर विजय मिळविणेही त्यांना कठीण जाणार आहे. यामुळे आपल्या समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी, आरक्षणासाठी आगामी निवडणुकीत आरएसएस सत्तेत येणार नाही हा अजेंडा राहील, असे प्रतिपादन भारिप-बमसंचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
मुस्लीम समाजाला आरक्षण द्यावे, यासह विविध मागण्यांची त्वरित पूर्तता करण्याच्या मागणीसाठी एमआयएमचे आकोट तालुकाध्यक्ष अ. सादीक इनामदार, भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव सोनोने आदींच्या नेतृत्वात मुस्लीम आरक्षण महामोर्चा २७ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

यावेळी मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन करताना ॲड. आंबेडकर बोलत होते. ते म्हणाले, आरक्षणासाठी मुस्लीम समाजाने यापूर्वीही आंदोलने केली, त्याला धर्माची किनार होती. मात्र, आरक्षण मिळविण्यासाठी राजकीय आंदोलने करणे आवश्यक आहे. १६ टक्के असणाऱ्या समाजाला घाबरून सरकार आरक्षण देते, मग १४-१५ टक्के असणाऱ्या मुस्लीम समाजाला आरक्षण का मिळू नये.

मराठ्यांना आरक्षण मिळाले ते मंजूर आहे. पण, मुस्लिमांकडे का दुर्लक्ष करण्यात येते, असा प्रश्न उपस्थित करून ॲड. आंबेडकर यांनी मुस्लिमांचा नेता जोपर्यंत तयार होणार नाही, तोपर्यंत मुस्लिमांच्या कोणत्याच समस्या सुटणार नाहीत. मुस्लीम समाजाचे धार्मिक नेते जशी ताकद दाखवितात, तशी राजकीय ताकद दाखविणे गरजेचे आहे. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.