प्रियंका गांधी दुर्गामाता तर नरेंद्र मोदी महिषासूर , ‘त्या’ पोस्टर वरून उसळला वाद

पटणा : बिहार वृत्तसंस्था – राहुल गांधी यांच्या पाटणा दौऱ्याच्या पूर्वसंसंध्येला त्यांच्या स्वागताचे लावलेल्या पोस्टरवर दुर्गामातेच्या रूपात तर नरेंद्र मोदी यांना महिषासूराच्या रूपात दाखवण्यात आल्याची घटना पाटणा शहरात घडली आहे. त्याच प्रमाणे या पोस्टरवर राहुल गांधी शंकराच्या रूपात दाखवण्यात आले आहेत. ‘राहुल-प्रियंका का सपना, खुशहाल हो देश अपना.’ असे वाक्य देखील या पोस्टरच्या खाली लिहण्यात आले आहे.

सदरच्या पोस्टर संदर्भात स्थानिक न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या पोस्टरने हिंदूंच्या भावना दुखावल्या असल्याचे त्या याचिकेत म्हणले आहे. तसेच हे पोस्टर काँग्रेसने स्थानिक नेत्याला जाणीवपूर्वक लावण्यास सांगितले आहे असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. तर काँग्रेसने या पोस्टरशी आपला संबंधच नाही असा दावा केला आहे.

या पोस्टरचा आणि आमचा कसलाही संबंध नाही भाजपने काँग्रेस पार्टीला बदनाम करू नये असे म्हणत बिहारचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांनी भाजपचे आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच भाजप सत्तेत आल्यापासून काँग्रेसच्या लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचे पोस्टर लावून भाजपची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले आहे. हा सर्व प्रकार खेदजनक आणि दुर्भाग्यापूर्ण असल्याचे भाजपचे माजी मंत्री सम्राट चौधरी यांनी म्हणले आहे.

३० वर्षानंतर बिहार मध्ये काँग्रेसने मोठ्या रॅलीचे आयोजन केले असून त्याची पाटण्याच्या रस्त्या रस्त्यावर पोस्टर झळकत आहेत. गेल्या आठवड्यातच रामाच्या रूपात राहुल गांधी आणि रावणाच्या रूपात नरेंद्र मोदी यांना दाखवणारे वादग्रस्त पोस्टर झकळवण्यात आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.