अहमदनगर महापालिकेचे ‘LBT’ कार्यालय ‘फोडले’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील स्थानिक संस्था कराचे कार्यालय व एका वृत्तपत्राचे कार्यालय चोरट्यांनी फोडले आहे. यात संगणक व इतर साहित्य चोरीस गेल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्यांनी शासकीय इमारतीही आता टार्गेट केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, जुन्या महानगरपालिकेजवळ महापालिकेचे कैकाडी महाराज व्यापारी संकुल आहे. यात मनपाचे मार्केट विभाग, एलबीटी विभाग, दोन वृत्तपत्रांची कार्यालये, पोस्टाचे कार्यालय आहे. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या संकुलातील मनपाच्या एलबीटी कार्यालय व वृत्तपत्र कार्यालयाचे कुलूप तोडून आतील सामानाची उचकापाचक केली. मनपाच्या कार्यालयातून संगणक संच व इतर साहित्याची चोरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तपत्राच्या कार्यालयातूनही संगणक संच चोरीला गेल्याचे सांगितले जात आहे जात आहे.

चोरीची माहिती मिळताच कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन भेट दिली. याप्रकरणी पंचनामा करण्याचे काम सुरू होते.