नगर – मनमाड रोडवर थरार, टोळक्याच्या हल्ल्यात ट्रक चालकाचा मृत्यू

नगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील नगर-मनमाड रोडवर निर्मळ पिंपरी शिवारातील टोलनाक्यावर सात जणांच्या टोळक्याने मध्य प्रदेशातील दोन मालट्रक चालकांवर हल्ला केला. टोळक्याने केलेल्या बेदम मारहाणीत एका चालकाचा मृत्यू झाला तर एक जखमी झाला आहे. ही घटना 6 सप्टेंबरला रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडली असून याप्रकरणी सोमवारी लोणी पोलीस ठाण्यात खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.

भूपेंद्रसिंह बहादुरसिंह ठाकूर आणि कुलदीपसिंग तुंग हे दोघे मालट्रकमध्ये गहू भरुन इंदूर येथून बेंगलोरच्या दिशेने जात होते. त्यांच्या ट्रकला निर्मळ पिंपरी शिवारातील टोलनाक्याजवळ 6 ते 7 जणांच्या टोळक्याने आडवले. या टोळक्याने ठाकूर आणि तुंग यांना तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणित कुलदीपसिंग तुंग याच्या मानेवर चाकूचा वर्मी घाव बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. चोरट्यांनी चालकाकडून 300 रुपये काढून घेऊन घटनास्थळावरुन फरार झाले.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुखांसह, वरिष्ठ पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सोमवारी रात्री उशीरा आठ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत, अशी माहीती पोलिसांनी दिली.