अरे देवा ! ‘गो एअर’, ‘स्पाइस जेट’ची देखील ‘स्टॅन्डअप’ कॉमेडियन कुणाल कामरावर बंदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरावर विमान प्रवासादरम्यान पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत इंडिगो आणि एअर इंडियासह आता स्पाइसजेट आणि गो एअर या विमान कंपन्यांकडून देखील प्रवासबंदी घालण्यात आली आहे.

इंडिगो कंपनीच्या विमानातून अर्णव गोस्वामी आणि कुणाल कामरा हे दोघे मुंबई – लखनौचा प्रवास करत होते. यावेळी कुणाल कामराने अर्णव यांच्या आसनाजवळ जाऊन त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्याचा हा व्हिडिओ कुणाल कामराने त्यांच्या ट्विटरवर ट्विट केला. याची दखल घेत इंडिगो या कंपनीने कुणाल कामरावर पुढील 6 महिने तर एअर इंडियाने पुढील नोटीस येईपर्यंत प्रवासाबंदी घातली आहे.

त्यासह आता स्पाइसजेट आणि गो एअरने देखील कुणाल कामकावर कंपनीच्या विमानातून प्रवास करण्यावर बंदी घातली आहे. याशिवाय एशिया इंडिया तसेच विस्तारा कंपनीकडून एअरलाइन्सच्या अंतर्गत समितीकडून आढावा घेतला जात असून त्यानंतर कारवाईचा निर्णय घेऊ असे सांगितले.

नागरी हवाई उड्डाणमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी इतर विमान कंपन्यांनीही कुणाल कामरावर कारवाई करावी असे म्हटले. पुरी म्हणाले की एखाद्या व्यक्तीला त्रास होईल आणि त्याच्या कामात व्यत्यय येईल, अशी विमानात केलेली वर्तणूक स्विकारार्ह नाही. अशा प्रवाशांनी विमानप्रवास करणे इतर प्रवाशांसाठी धोकादायक आहे.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने बुधवारी सांगितले की गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांबाबत असलेल्या नियमांनुसार 4 विमान कंपन्यांनी कुणालवर प्रवासबंदीची करावाई केली आहे. आता हे प्रकरण अतंर्गत समितीकडे सोपवावे लागणार असून या समितीला 30 दिवसाबाबत अंतिम निर्णय द्यावा लागेल असेही ते म्हणाले.