बारामतीच्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांसाठी अजितदादा उरतले क्रिकेटच्या मैदानात !

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – ज्या बारामतीकरांनी भरभरून मताधिक्याने विजयी केले, त्या बारामतीकरांबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar ) हे नेहमीच मृदू असतात, अनेकदा कार्यकर्ते आग्रह करतात, आणि ज्यांनी इतकी वर्षे जिवाभावाने काम केले त्यांचा शब्दही अजितदादांनाही मोडवत नाही. अजितदादां राज्यात विक्रमी मताधिक्याने का विजयी होतात त्या यशामागच सर्वात महत्वाच कारण म्हणजे छोट्यातील छोट्या कार्यकर्त्याला ते जपत असतात. त्याच्या अडचणीला धावून जातात आणि आग्रह देखील मान्य करतात हेच आहे.

आजही असेच काहीसे झाले. बारामतीत गेल्या अनेक वर्षांपासून अजित पवार यांच्यासाठी रात्रीचा दिवस करून काम करणारा सतीश खुडे नावाचा एक साधा कार्यकर्ता. निवडणूकीत जीव तोडून प्रचार करणारा. तसेच दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित करण्याची त्याची परंपरा आहे. यंदाही त्याने असेच सामने भरवले आहेत. त्याने मुंबईच्या जनता दरबारात जात अजितदादांकडे विनंती केली की दोन मिनिटे का होईना दादां तुम्ही मैदानावर येऊन भेट देऊन जा. आपल्या कार्यकर्त्याचा आग्रह मोडतील ते अजित पवार कसले. अत्यंत व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून ते आवर्जून आले, या सामन्यांचे उद्घाटन थेट बँट हातात घेत बँटींग करुन केले. सतीश खुडे याच्या आग्रहाखातर व्यासपीठावरही काही काळ गेले, सर्वांना शुभेच्छा देऊन मग ते काटेवाडीकडे मार्गस्थ झाले.

खुडे हा बारामतीतील एक छोटासा कार्यकर्ता. 1992 पासून अजितदादांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक निवडणूकीत रात्रीचा दिवस करणारा. दादांनाही हाडाचे कार्यकर्ते अचूकपणे माहिती असल्याने आज त्यांनी आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत आपणही कार्यकर्त्यांचा सन्मान करतो हेच दाखवून दिले.