‘नाशिकमध्ये होणारं साहित्य संमेलन उजवं व्हायला हवं’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन – 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा मान यंदा नाशिकला मिळाला असून ही शहरवासीयांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. त्यामुळे हे संमेलन यशस्वी करणे आणि नाशिकची वेगळी ओळख निर्माण करणे ही आपली सर्वांची सामुहिक जबाबदारी असून ते उजवं कसे होईल यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन स्वागताध्यक्ष तथा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नियोजन समिती व नाशिककरांना केले आहे.

नाशिकमध्ये होणा-या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 25) नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिक येथील संपर्क कार्यालयात बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, लोकहितवादी मंडळाचे जयप्रकाश जातेगावकर आदी उपस्थित होते.

भुजबळ म्हणाले की, साहित्य संमेलन आनंदात पार पडले पाहिजे. या निमित्ताने नाशिकचे सांस्कृतिक, सामाजिक वैभव जगासमोर गेले पाहिजे. या संमेलनासाठी शासनस्तरावरून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. त्यात कुठलीही कमतरता राहणार नाही. तसेच नाशिककरांकडून देखील नक्कीच सहकार्य मिळेल यात कुठलीच शंका नाही असे ते म्हणाले. तसेच साहित्य संमेलन पार पडत असतांना नाशिकचे महापौर, जिल्हा प्रशासन यांच्यासोबत महत्वाच्या व्यक्तींना सामावून घेऊन योग्य ते नियोजन करावे. तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील नामंवत व्यक्तींना सामावून घ्यावे तसेच प्रत्येक व्यक्तिंचा सन्मान राखला जावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.