Coronavirus : पुण्यातील सर्व खासगी डॉक्टर आता सरकारच्या अखत्यारित, करावे लागणार ‘कोरोना’बाधितांवर उपचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना संसर्गित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुण्यामधील सर्व खाजगी डॉक्टरांच्या सेवा आपत्ती नियमन कायद्याअंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी अधिग्रहित केल्या आहे. त्यामुळे सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोना संसर्गित रुग्णांवरती उपचार करावे लागणार आहे. आणीबाणीच्या काळात सरकारकडे असे अधिकार असतात. त्याचाच वापर जिल्हाधिकाऱ्यांकडून केला गेला आहे.

याबाबत बोलताना ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले की, गरजेनुसार नियोजन करून सर्व खाजगी डॉक्टरांना कोरोना संसर्गित रुग्णांवर उपचाराकरिता बोलवणार आहोत. तसेच सेवा देण्याच्या बदल्यात या डॉक्टरांना सरकारी मोबदला देण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिली आहे. पुण्यातील रुग्णांची वाढती संख्या व यंत्रणेवरील येणारा ताण तसेच अपुरा कर्मचारी वर्ग असे यामागचे कारण असल्याचे बोलले जात आहे.

देशात कोरोना संसर्गाचा आकडा ९००० च्या वर गेला आहे. तर ३०० हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात देखील कोरोना संसर्गाची संख्या वाढत असून आज ८२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०६४ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, निजामुद्दीन येथे गेलेल्या तबलिगी जमातीच्या ५८ सदस्यांपैकी ४० जणांची माहिती मिळाली असून त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर १८ जण अजूनही बेपत्ता आहे. पोलिसांकडून त्यांचा तपास सुरु आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले, की हे सर्व ४० जण भारतीय आहे. आम्ही त्यांना क्वारंटाइन ठेवण्याचा आदेश जरी केला आहे. जर त्यांचा कोरोना संसर्ग अहवाल निगेटिव्ह आला तर प्रक्रिया करून त्यांना सोडण्यात येईल. तसेच राज्यातील अधिकाऱ्यांनी यापूर्वी १५६ परदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व नागरिक दिल्लीतील निजामुद्दीन कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांच्यावर व्हिसाचा दुरुपयोग व अन्य गुन्हांचे आरोप लावण्यात आले आहे.