‘आमच्या सगळ्यांच्या कष्टाचं चीज झालं’, ‘सिरम’च्या अधिकार्‍याला भावना अनावर झाल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगात थैमान घातलेल्या कोरोनावरील लसीकरणास भारतात येत्या १६ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. आज पहाटे कोविड लसीचे डोस पुण्यातील ‘सीरम’ इन्स्टिट्यूटमधून रवाना झाले. लस असलेले कंटेनर कडेकोट पोलीस बंदोबस्तात विमानतळावर गेले. तिथून ही लस १३ शहरांत पाठवण्यात येणार आहे. त्यात औरंगाबाद, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू, कोलकाता, कर्नाल, विजयवाडा, हैदराबाद, लखनऊ, चंदीगड, भुवनेश्वर, गुवाहाटी या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, कोरोना महामारीचा कहर सर्वत्र झालेला असताना आमच्या कंपनीने लस शोधली. त्यानंतर तिचे वितरण होणार असून खऱ्या अर्थाने कंपनीतील शास्त्रज्ञ, कर्मचारी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमाचे आज चीज झाले, अशी भावना सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे यांनी व्यक्त केली.

सिरम इन्स्टिट्यूटमधून आज पहाटे साडेचारच्या सुमारास ‘कोव्हिशील्ड’चे डोस घेऊन तीन कंटेनर बाहेर पडले. तत्पूर्वी, पुणे परिमंडळ ५ च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून कंटेनरची पूजा करण्यात आली. कडक पोलीस बंदोबस्तात हे कंटेनर विमानतळावर पोहोचले असून तिथून ते निश्चित स्थळी पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

या संदर्भात बोलताना सिरम इन्स्टिट्यूटचे सहायक निर्यात अधिकारी हनुमंत अलकुंटे म्हणाले, कोरोनावरील लस तयार करण्यासठी आमच्या कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. एकीकडे प्रचंड मेहनत आणि दुसरीकडे कोरोनाची दहशत, यातुन आम्ही मार्ग काढत अखेर लस तयार करण्यात यशस्वी झालो. या कठीण काळात, आमच्या कंपनीतील अनेकांना कोरोना झाला मात्र आमचे मालक आदर पुनावाला यांनी, बाधित कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय आणि आमची खुप काळजी घेतल्याने, आलेल्या प्रत्येक संकटाले आम्ही धीरोदात्तपणे सामोरे गेलो. आमची कंपनी १८ प्रकारच्या लसी तयार करते.मात्र गेले काही महिने आम्ही केवळ कोरोनावर लक्ष केंद्रीत केले होते. अखेर लस तयार करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यानंतर आता हि लस देण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे आमच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झाले असून आमचे जीवन सार्थकी लागले, अशी कंपनीतील प्रत्येकाची भावना आहे, असेही अलकुंटे म्हणाले.