Coronavirus : आता ‘कोरोना’ संशयितांच्या हातावर शिक्का

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशातून आलेल्या पण सध्या लक्षणे न दिसणार्‍या नागरिकांना १४ दिवस त्यांनी घरातच स्वत:ला वेगळे ठेवण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र, हे नागरिक त्याकडे दुर्लक्ष करुन समाजात फिरताना आढळून आले आहे. त्यामुळे ज्यांना होम क्वारेंटाइन करण्यास सांगितले आहे. त्यांच्या हातावर स्टॅम्प मारण्यास राज्यात सुरुवात झाली आहे. जेणे करुन हे बाहेर समाजात वावरु लागले तर लोकांच्या ही गोष्ट लक्षात येईल.

देशात सर्वाधिक 38 कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दररोज परदेशातून मोठ्या संख्येने प्रवासी आता देशात परत येत आहेत. त्या सर्वांना विलगीकरण कक्षात ठेवणे शक्य नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये सध्या कोणतीही लक्षणे दिसत नाही. त्यांना स्वत:च्या घरात वेगळे राहण्यास सांगितले जात आहे. अशा संशयितांवर होम क्वारेंटाईन असा शिक्का मारण्यात येत आहे. त्यावर तारीखही लिहिली जात आहे. तोपर्यंत संशयिताने घरीच वेगळे राहणे अपेक्षित आहे.

कोरोना संशयितांची ओळख पटावी, यासाठी अशा प्रकारे शिक्के मारण्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली होती. त्याची अंमलबजावणी आज सुरु झाली. त्यानंतर हॉस्पिटल व विमानतळावरील सर्व नियुक्त अधिकार्‍यांना मुंबई पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी आदेश काढला आहे. त्यानुसार घरी वेगळे राहण्याची सूचना दिलेल्या नागरिकांच्या डाव्या हातावर वरील भागावर शिक्का मारावा, त्यावर आयसोलेशन तारीख टाकावी. ही तारीख १४ दिवस पूसली जाणार नाही, अशी असावी.