‘मराठी’ भाषेला अभिजात ‘दर्जा’ देण्यासंदर्भात शासन ‘कटिबद्ध’ : अमित देशमुख

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कला, संस्कृती, नाट्या, संगीत यांची जोपासना करण्याबरोबरच मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात शासन कटिबद्ध आहे. महाविकास आघाडीचे सरकार आणि सांस्कृतिक खात्याकडून विविध प्रश्नांना गती देण्याचे काम केले जाईल, अशी ग्वाही देत राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी हे सरकार पाच वर्षे नक्की टिकेल, याबाबत कुणीही मनात शंका आणू नये असा विश्वास व्यक्त केला.

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘पिफ’च्या उद्घाटनाच्यावेळी ते बोलत होते. सांस्कृतिक मंत्री झाल्यानंतर पुण्यातील हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम होता. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल, पुणे फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता, महापौर मुरलीधर मोहोळ, अभिनेते शिवाजी साटम, आदित्य श्रीवास्तव, दयानंद शेट्टी, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि अभिनेता सुबोध भावे उपस्थित होते.

अमित देशमुख पुढे म्हणाले, राज्यात निवडणूका झाल्यानंतर बरेच काही घडले. माझ्या आयुष्यात असा योग एवढ्या लवकर येईल असे वाटले नव्हते. मात्र, एक सांस्कृतिक मंत्री या नात्याने माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. महाराष्ट्राची कला संस्कृती जोपासण्यासाठी मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात शासन कटीबद्ध आहे. यासाठी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करु. तसेच इंग्रजी शाळांमध्ये मराठी सक्तीची करण्यासंदर्भात शासनाने निर्णय घेतला असून याची अंमलबजावणी लवकरच केली जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/