शेतीच्या वादातून आईला ट्रॅक्टरसमोर टाकणाऱ्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल, एकाला अटक तर एक फरार

वाशिम : पोलीसनामा आॅनलाईन

शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरसमोर टाकल्याची धक्कादायक घटना मालेगाव तालुक्यातील मुंगळा या गावात घडली होती. सदरचा संपूर्ण प्रकार हा कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर हा व्हिडीअो सोशल मीडीयावर व्हायरल झाला. याप्रकरणाची पोलिसांनी गांभिर्याने दखल घेतली असून, दोन्ही भावांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला आहे. काैलास दळवी व अंकुश दळवी अशी या दोघांची नावे आहेत. यानंतर तात्काळ कारवाई करत सायंकाळी अंकुश दळवी याला पोलिसांनी अटक केली असून,कैलास दळवी मात्र फरार झाला आहे.

पहा नेमकं काय आहे प्रकरण
वाशिम जिल्ह्यात शेतीच्या वादातून आपल्या जन्मदात्या आईवरच ट्रॅक्टर घातल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव तालुक्यातील मुंगळा गावात समोर आला होता. सदरची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

वाशिममधील मुंगळा गावात गुरुवारी शेतीमध्ये पेरणीच्या वादात दोन गटात तुफान बाचाबाची झाली. 40 वर्षापासून हा शेतीचा वाद सुरु आहे. मुंगळा शिवारात कैलास दळवी हे आपल्या कुटुंबासोबत पेरणी करताना गावातीलच राऊत कुटुंब त्याठिकाणी ट्रॅक्टर घेवून आले. शेती कुणाची आहे यावरुन दळवी आणि राऊत कुटुंबात वाद झाला. यावेळी कैलास दळवी यांनी आपल्या आईलाच ट्रॅक्टरसमोर टाकलं. हा प्रकार इथेच थांबला नाही, तर राऊत कुटुंबांने कैलास दळवी आणि त्यांच्या पत्नीला झाडाला बांधून ठेवले. राऊत कुटुंबाने देखील कैलास दळवी यांच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.