परस्पर महिलेने फ्लॅटचा ताबा घेतला

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून, ताबा घेऊन, शिवीगाळ आणि धमकी देणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गॅलेड चौक पिंपरी येथे घडली.

भाग्यश्री सुनील यादव (४१, रा. नवी सांगवी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तर लता किसन कांबळे (रा. बलदेव नगर, पिंपरी) या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅलेड चौक पिंपरी मधील सी ब्लॉक फिर्यादी भाग्यश्री यांचा फ्लॅट आहे. त्यामध्ये त्यांनी प्रिंटिंग मशीन आणि इतर साहित्य आणि कागदपत्रे ठेवली होती. ६ नोव्हेंबर २०१८ ते ३ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत भाग्यश्री यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. त्यादरम्यान आरोपी महिलेने बेकायदेशीररित्या फ्लॅटचे कुलुप तोडले.

जबरदस्तीने फ्लॅटचा ताबा घेतला. त्यामध्ये भाडेकरू ठेऊन स्वतःचे कुलूप लावले. याबाबत फिर्यादी भाग्यश्री यांनी विचारणा केली असता आरोपी महिलेने त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच ‘तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली. तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.