… अन् ‘त्या’ क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू तरळले, पंकजा मुंडेंनी सांगितला आजचा अनुभव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माझ्या देशातील शेतकरी विकसित होत आहेत, आज देशातील 9 हजार कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एका क्षणात 18 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. ज्यावेळी, स्क्रीनवर आकडे स्क्रोल होत होते, त्यावेळी मला अभिमान वाटत होता, त्याक्षणी माझ्या डोळ्यात अश्रू तरळले होते, असे भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी म्हटले आहे. पंकजा मुंडे यांनी आजच्या व्हर्च्युअल कार्यक्रमास हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचा फोटो शेअर करत त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती व सुशासन दिनानिमित्त भाजपा रायगड आयोजित ‘शेतकरी संवाद अभियान’ कार्यक्रमात शहाबाज येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज दुपारी 12 वाजता शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी सन्मान निधीचा पुढचा हप्ता पाठविला. याअंतर्गत देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात एकूण 18 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. मोदींनी यावेळी देशातील सहा राज्यांमधील शेतकऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवादही साधला. महाराष्ट्रातही विविध ठिकाणी मोदींच्या या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले होते. विरोधी पक्षनेत्यांसह मोठे भाजपा नेते या कार्यक्रमाला हजर होते. राज्यात विविध ठिकाणी हा कार्यक्रम व्हर्च्युअल पद्धतीने ऐकण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भात, पंकजा मुंडेंनी आपला अनुभव शेअर केला आहे.

शेतकऱ्याने सांगितला अनुभव
यावेळी, मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या मनोज नावाच्या शेतकऱ्याने नव्या कृषी कायद्यांमुळे फायदा झाल्याचे सांगितले. नव्या कायद्यांमुळे नवे पर्याय उपलब्ध झाले. आधी आमच्याकडे बाजारात जाऊन शेतमाल विकण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, आता आम्ही खासगी व्यापारी किंवा संस्थांना शेतमाल विकू शकतो. ते आमच्यासाठी फायदेशीर ठरते, असं मनोज यांनी मोदींना सांगितले.

मोदींचा विरोधकांवर निशाणा
मनोज यांनी त्यांचा अनुभव सांगितल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लक्ष्य केले. काही जण त्यांची राजकीय विचारधारा शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल असा अपप्रचार त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र, आता शेतकरीच त्यांना फायदा होत असल्याचे सांगत आहेत, अशा शब्दात मोदीनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.