Coronavirus Impact : चक्क आमदाराने धरले पोलिसांचे पाय, ‘कोरोना’चा असाही ‘इफेक्ट’ (व्हिडिओ)

हैदराबाद : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे देशच नाही तर जग देखील कामाला लागलं आहे. सर्व कामं बाजूला ठेवून सर्वचजण कोरोनाशी लढत आहे. सगळ्या विभागांची सगळी कामे मागे पडली असून फक्त कोरोनासोबत लढायचे हाच प्रत्येकाचा उद्देश आहे. यात सर्वात आघाडीवर आहेत ते म्हणजे डॉक्टर आणि रुग्णालयामध्ये काम करणारे कर्मचारी आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणारे पोलीस कर्मचारी. यांच्यावर कामाचा प्रचंड ताण आहे. या सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ते करत असलेल्या कामाचे देशभरातून कौतूक होत आहे.

विशाखापट्टनम याठिकाणी एका आमदाराने चक्क पोलीस अधिकाऱ्याचेच पाय धरले. आमदाराने कोणत्याही कामासाठी किंवा पोलिसांच्या धाकामुळे पाय धरले नाहीत तर पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी पोलिसांचे पाय धरले. अरक्कूचे आमदार चेट्टी फाल्गुना यांनी पोलिसांचे पाय धरून कृतज्ञता व्यक्त केली. पोलीस अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर प्रचंड ताण आहे. त्यामुळे कृतज्ञता आणि आदर दाखवण्यासाठीच मी हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कृत्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

कोरोना विषाणूमुळे जगभरात 8 लाख 60 हजार 106 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 42 हजार 334 जणांचा मृत्यू झाला आहे. या विषाणूने भारतात देखील शिरकाव केला आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1637 वर पोहचली आहे. तर मृतांचा आकडा 38 वर पोहचला आहे. कोरोना व्हायरसच्या प्रकरणांमध्ये एकाच दिवसात इतक्या झपाट्याने वाढ होण्याचे कारण निजामुद्दीन परिषद आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.