तिरुपतीच्या मंदिरातील तीन मौल्यवान मुकुट चोरीला

चेन्नई : वृत्तसंस्था – अनेकांचे श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती येथील गोविंदराज स्वामी मंदिरातील तीन मूर्तींचे  मौल्यवान मुकुट चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या तिनही मुकुटांचं वजन हे जवळपास १.३ किलोग्रॅम असून ज्या मंदिरात ही चोरी झाली आहे, ते बाराव्या शतकातील मंदिर असल्याची माहिती मंदिर अधीक्षक ज्ञान प्रकाश यांनी दिली. सायंकाळी प्रसाद वाटपाच्या वेळी ही चोरी झाल्याचा संशय मंदिर प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे मुकुट व्यंकटेश्वर, श्री महालक्ष्मी आणि श्री पद्मावती या देवतांच्या मूर्तींचे आहे. सोन्याचे आणि हिरेजडित असे हे अतिशय मौल्यवान मुकुट चोरीला गेल्याचं लक्षात येताच मंदिर प्रशासन आणि परिसरात एकच खळबळ माजली आहे. प्रसाद वाटपाच्या वेळेत सायंकाळी ५ वाजल्यापासून, ते ५ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येतं. याचदरम्यान, जेव्हा पूजारी म्हणून मंदिरात काम पाहणाऱ्या हरिकृष्ण दीक्षितुलू यांनी विजयसारादी या पुजाऱ्यांकडून मंदिराची जबाबदारी स्वीकारली तेव्हा मुकूट चोरीला गेल्याची बाब त्यांच्या नजरेत आली. त्याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

या प्रकरणात तक्रार नोंदवण्यात आली असली तरीही अद्यापही कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. मंदिरातील या चोरीचं कृत्य पाहता सीसीटीव्ही फूटेज आणि इतर सर्व मार्गांनी चोरांचा शोध घेण्याचे प्रयत्न  सुरू आहेत.