धक्कादायक ! नगरमध्ये 2 मुलांची हत्या करून अंगणवाडी सेविकेची आत्महत्या, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत तालुक्यातील झिंजेवाडी येथे आई व दोन मुलांचे मृतदेह आढळून आले. अंगणवाडीसेविकेने दोन मुलांची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर तिने हे कृत्य केले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे. आज घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

उज्ज्वला संदीप जाधव (वय २४), राजवीर (वय ५), उत्कर्षा (वय ८ महिने, तिघे रा. छिंजेवाडी, ता. कर्जत, जि. अ.नगर) ही मयतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, जाधव यांच्या राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत अंगणवाडी सेविका उज्ज्वला जाधव हिचा मृतदेह आढळून आला. दोन मुलांचे मृतदेह पलंगावर होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक संजय सावंत यांच्यासह कर्जत पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनाना करून मृतदेह ताब्यात घेऊन रुग्णालयात आणले.

उज्ज्वला जाधव यांचा खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान मयत उज्वला हिने दोन मुलांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

You might also like