अनिकेत कोथळे खून प्रकरण : गुन्ह्याचा खटला सत्र न्यायालयाकडे वर्ग

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – अनिकेत कोथळेचा खून केल्यानंतर त्याच्यासह त्याचा मित्र अमोल भंडारे पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव करून तसा खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह पाचजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीआयडीने प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. त्यावर शुक्रवारी (दि.२६) सुनावणी झाल्यानंतर तो खटला आता जिल्हा व सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावर आता १५ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरूण टोणे, नसरूद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेतसह अमोल भंडारेला लुटमारीप्रकरणी कामटेसह त्याच्या साथीदारांनी अटक केली होती. त्यादिवशी रात्री कामटेसह साथीदारांच्या मारहाणीत अनिकेतचा मृत्यू झाला होता. नंतर दुसर्‍या दिवशी संशयितांनी आंबोलीतील कावळेसाद येथे मृतदेह नेऊन जाळला होता. त्यानंतर कामटेसह त्याच्या साथीदारांनीच अनिकेतचा खून केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सर्व संशयितांना अटक करणत आली होती.

अनिकेतचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर कामटेने तो आणि अमोल भंडारे पोलिस कोठडीतून पळून गेल्याचा बनाव केला होता. तशी नोंदही स्टेशन डायरीत केली होती. त्यानंतर कामटेने अनिकेत आणि अमोलवर पळून गेल्याचा गुन्हाही दाखल केला होता. मात्र तो खोटा असल्याचे सीआयडीच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानंतर कामटेसह लाड, टोणे, मुल्ला, शिंगटे यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर सीआयडीच्या निरीक्षक गीता बागवडे यांनी त्याचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले होते. याप्रकऱणी शुक्रवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. आर. इंदलकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड. शकील पखाली यांनी म्हणणे मांडले. त्यानंतर हा खटला आता सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यावर आता सत्र न्यायालयात दि. १५ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.

दरम्यान अनिकेत कोथळे खूनप्रकऱणी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दि. १६ ऑक्टोबरला याप्रकरणी झालेल्या सुनावणीवेळी अ‍ॅड. निकम यांनी आरोप निश्‍चीतीचा मसुदा न्यायालयासमोर सादर केला होता. यामध्ये कामटेसह सर्व संशयितांवर दहा आरोप प्रस्तावित करण्यात आले आहेत. त्यावर आता दि. २२ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.