अयोध्येत राममंदिर होणारच : खासदार शिरोळे

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – विश्व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेला भाजपचे खासदार अनिल शिरोळे उपस्थित राहिले आणि राममंदिर उभारणीच्या संकल्पात सक्रीय राहू असे त्यांनी जाहीर केले.

राममंदिर निर्माणासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशा मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या पुणे विभागाने रविवारी धर्मसभा आयोजित केली होती. या परिषदेला खासदार शिरोळे, कागशिला पीठाधीश्वर महंत साध्वी प्रज्ञा भारतीय, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, दादा वेदक, रविंद्र वंजारवाडकर, पांडुरंग राऊत, सभेचे संयोजक किशोर चव्हाण आदी हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राममंदिर निर्माण कायद्याच्या मागणीचे निवेदन सभेच्यावतीने शिरोळे यांना देण्यात आले.

अयोध्येत राममंदिर होणारच असे सांगताना शिरोळे यांनी सरकारही त्यासाठी कटिबध्द असल्याचे सांगितले. १९९२ सालच्या करसेवेतही आपण सहभागी होतो याची आठवणही सांगितली. राममंदिर उभारणीचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाने प्रशस्त करावा, असे आवाहन शिरोळे यांनी केले. रामभक्तांच्या भावनांना प्रतिसाद देण्यासाठी आपण येथे आल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाला जोरदार प्रतिसाद मिळाला.

आजच्या स्वाभिमानी सरकारने विधेयक आणून मंदिर बनवायला हवे, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष सावला यांनी सांगितले.

जो रामाचे काम करेल त्यालाच आपण मत देऊ असा संकल्प करण्याचे आवाहन साध्वी प्रज्ञा भारतीय यांनी केले. मंदार परळीकर यांनी सूत्रसंचालन केले, श्रीकांत चिल्लाळ यांनी आभार मानले.

देशातील सत्तेचा मार्ग दिल्ली नव्हे, अयोध्येतून जातो