Pune News : केंद्रीय ग्रामविकास खात्याच्या सचिवाच्या नावाने पुणे मेट्रोच्या संचालकांना फोन, भामटा म्हणाला…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  केंद्र सरकारच्या एका अधिकाऱ्याचे नाव सांगून पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक आणि पीएमआरडीएच्या (PMRDA) प्रमुखांना फसवण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोरेगाव पार्क आणि चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही अधिकाऱ्यांना फोन करणारी व्यक्ती एकच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA)चे प्रमुख सुहास दिवशे (रा. पाषाण) यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, PMRDA कडून शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रोचे काम केले जात आहे. 16 जानेवारी दिवशी दिवशे यांना एका अनोळखी क्रामांकावरुन फोन आला. त्या व्यक्तीने केंद्रीय ग्रामविकास खात्याचे सचिव डी.एस. मिश्रा असल्याचे सांगितले.

फोन करणाऱ्या व्यक्तीने दिवशे यांना मेट्रोच्या ठेकेदारांची माहिती विचारुन त्यांना फोन करण्यास सांगितले. मेट्रोचे ठेकेदार गुप्ता यांच्याकडून आर्थिक लाभ मिळावा, या उद्देशाने त्यांना सतत फोन करण्यात आले. हा प्रकार दिवशे यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी याची चौकशी केली. त्यावेळी त्यांना फसवेगिरी असल्याचे समजले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

दुसरा गुन्हा कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र रेल्वे कॉर्पोरेशन लि. कार्यकारी संचालक गौतम बिऱ्हाडे (वय-52) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी अज्ञात फोन धारक व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गौतम बिऱ्हाडे यांना देखील अशाच पद्धतीने मिश्रा यांच्या नावाने फोन करण्यात आला होता. त्यांच्याकडून देखील ठेकेदाराची माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पुढील तपास कोरेगाव पोलीस करीत आहेत.