संशयास्पद ! केरळमध्ये आणखी एका हत्तीणीची कु्ररतेनं हत्या ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – केरळमध्ये एका गर्भवती हत्तीणीची निर्दयीपणे हत्या झाल्याच्या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असतानाच अशीच अजून एक घटना समोर आली आहे. कोल्लम जिल्ह्यात एका महिन्यापूर्वी एका तरुण हत्तीणीचा मृत्यू झाला होता. यावेळी तिच्या तोंडात जखमा झाल्याचे दिसून आले आहे.

गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस खायला घालण्यात आल्यानंतर, पोटात झालेल्या स्फोटामुळे तिचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. भुकेने व्याकूळ असल्याने ही हत्तीण मानवी भागात अन्नाच्या शोधात आली होती. यावेळी तिला फटाक्यांनी भरलेले अननस खायला घालण्यात आले. तीन दिवस हत्तीण पाण्यातच मृत्यूची वाट पाहत उभी होती. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून हत्तीणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. पण अखेर तिचा मृतदेहच बाहेर काढावा लागला. एप्रिल महिन्यात कोल्लम जिल्ह्यातील पथनपुरम जंगल क्षेत्रात एका हत्तीणीचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. जंगल क्षेत्रापासून काही अंतरावर हत्तीण गंभीर अवस्थेत आढळली होती.

ही हत्तीण कळपापासून दूर आली होती. तिचा जबडा तुटला होता, काही खाणेही तिला शक्य होत नव्हते.हत्तीणीची प्रकृती खूप नाजूक होती. जेव्हा वन अधिकारी पोहोचले तेव्हा हत्तीण जंगलात पळाली आणि तिथे वाट पाहणार्‍या आपल्या कळपात शिरली. पण दुसर्‍या दिवशी पुन्हा हत्तीण आपल्या कळपापासून दूर आली असल्याचे दिसून आले. तिला योग्य उपचार देण्यात आले पण दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.