कुख्यात गँगस्टरकडून प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना जीवे मारण्याची ‘धमकी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक उदित नारायण यांना अज्ञात गुंडांकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. उदित नारायण यांना फोन कॉलवरून धमकावण्यात आले आहे. खंडणीसाठी त्यांना धमकावण्यात आले असून शिवीगाळही करण्यात आली आहे. या घटनेनंतर त्यांनी मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी शाखेकडे आणि अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी याबाबत एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली आहे. याशिवाय या गुन्ह्याचा तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उदित नारायण यांना कॉल करणारी व्यक्ती त्याचे नाव रवी पुजारी असल्याचे सांगत आहे. गेल्या महिन्याभरात त्यांना अज्ञात व्यक्तींकडून 3 वेळा जीवे मारण्याची धमकी फोनवरून देण्यात आली आहे. फोन करणारी व्यक्ती उदित नारायण यांच्याकडे मोठ्या रकमेची मागणी करत आहे. जर पैसे देण्यास नकार दिला तर जीवे मारलं जाईल असे म्हणत आहे. शिवाय शिवीगाळही करत आहे. उदित नारायण यांनी आपल्या तक्रारीत हे सगळं नमूद केलं आहे.

पोलिसांनी या प्रकरणी प्राथमिक चौकशी केल्यानंतर असे समजले आहे की, फोन करणाऱ्याचे लोकेशन बिहार राज्यातील आहे. इतकेच नाही तर ज्या नंबरवरून धमकी दिली जात आहे तो नंबर सीम कंपनीत वॉचमनच्या नावावर असल्याचं नोंद झालं आहे. पोलिसांनी संबंधित सुरक्ष रक्षकाकडे चौकशी केली असता त्याने आपला फोन चोरीला गेल्याचे सांगितले आहे. त्याने असेही सांगितले आहे की, फोन चोरीला गेला तेव्हा ते बिहारला गेला होता.

आरोग्यविषयक वृत्त