कोकणात भाजप अन् सेनेच्या खासदारांमध्ये ‘घमासान’, राऊत-राणेंच्या खडाजंगीनंतर कार्यकर्ते देखील भिडले

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन –  भाजप खासदार नारायण राणे आणि शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यातील वैर अख्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोघेही एकमेकांवर टीका करताना दिसतात. राणे यांनी शिवसेना सोडल्यापासून ते सेनेवर सातत्याने टीका करत असतात. गुरुवारी (दि. 28) हे दोघे समोरासमोर आले आणि वादाची ठिणगी पडली. दोघेही एकेनासे झाल्याने शेवटी पालकमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करत वाद मिटविला.

जिल्हा नियोजन बैठकीच्या निमित्ताने सिंधुदुर्गमध्ये आज खासदार राणे आणि राऊत दोघेही एकत्र आले होते. बैठकीत तिलारी धरणाचा डावा कालवा फुटल्याच्या मुद्द्यावरुन भाजप सदस्य राजन म्हापसेकर यांनी आपली भूमिका मांडली. परंतु, यावर सेनेचे सदस्य बाबुराव धुरी यांनी आक्षेप नोंदवला. यामुळेच राणे आणि राऊत यांच्यात टोकाचा शाब्दिक वाद झाला. राणे-राऊत यांच्यात शाब्दिक वाद सुरू होताच दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनीही सभागृहात राडा घातला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी पालकमंत्री सामंत यांनी मध्यस्थी केली. सामंत यांनी तिलारी धरण प्रश्नी संबंधित विभागाची बैठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिले. त्यावेळी राऊत आणि राणे समर्थक शांत झाले.