पोलिसांच्या मदतीने लष्करी जवानाची बॅग मिळाली परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – रिक्षाने प्रवास करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानाची चुकून बॅग विसरून राहिली. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधल्यावर खडकी पोलिसांनी रिक्षा व रिक्षाचालकाला शोधून ती बॅग परत मिळवून दिली. त्यामुळे जवानाने पोलिसांचे आभार मानले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश तानाजी माने (रा. मु. पो. रहिमतपूर ता. कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा) हे भारतीय सैन्य दलातील जवान पुणे विमानतळावर २२ फेब्रुवारी रोजी उतरले. त्यानतंर त्यांनी तेथून एका रिक्षाने स्वारगेटपर्यंत प्रवास केला. त्यांच्याकडे त्यावेळी दोन बॅग होत्या. मात्र रिक्षातून उतरताना त्यांची एक बॅग चूकून रिक्षात विसरून राहिली. परंतु उतरल्यावर काही वेळाने त्यांच्या लक्षात ही बाब आली. परंतु तोपर्यंत रिक्षा तेथून निघून गेला होता.

त्यांनी रिक्षाच्या नंबरवरून रा मालका नाव व पत्ता घेतला. त्यावेली तो रिक्षा खडकी बाजार येथील नासीर अहमद शेख बादशाह याचा असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी खडकी बाजार येथे येऊन खडकी बाजार बीट मार्शल पोलीस कर्मचारी चिंतले व केदारी यांची भेट घेऊन हकिकत सांगितली. तसेच त्यात सैन्याचे अतिमहत्त्वाची कागदपत्रे असल्याची माहिती त्यांना दिली.

पोलिसांनी नासीरचा शोध घेतला. परंतु त्याने ती रिक्षा दोन वर्षांपुर्वी ब्रोकर मार्फत विकली असल्याचे सांगितले. पोलिसांनी ब्रोकरशी संपर्क साधून रिक्षा ज्याला विकली त्याची माहिती मिळवली. त्यावेळी तो रिक्षाची पासिंग करून घेणअयासाठी त्यांच्याकडे आला होता असे सांगून त्याचा मोबाईल क्रमांक दिली. त्यानंतर त्या रिक्षाचा चालक आकाश अशोक जाधव (गुलटेकडी) याच्याशी संपर्क साधला. त्याला ती बॅग खडकी बाजार पोलीस  चौकीत आणून जमा करण्यास सांगितले. त्याने सहायक पोलीस निरीक्षक हरिष ठाकूर यांच्याकडे ती बॅग आणून दिली. त्यानंतर त्यांनी ती बॅग जवान ऋषिकेश माने यांच्याकडे सुपुर्त केली. पोलिसांच्या मदतीने माने यांना लष्कराच्या अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांची बॅग परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचा आभार मानले.