10 दिवसांच्या सुट्टीवर आलेल्या जवानानं पत्नीला संपवलं, 2 वर्षापुर्वीच झालं होतं Love मॅरेज

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीनगर येथे लष्करात नोकरी करणाऱ्या एका सैनिकाने नाशिक येथे १० दिवसांच्या सुट्टीवर आल्यानंतर आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या सैनिकाने केवळ पत्निची हत्याच केली नसून स्वत: देखील हाताची नस कापून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे दोनच वर्षांपूर्वी यांचे लग्न झाले असून त्यांना तीन महिन्याची मुलगी देखील आहे.

माहेरून पैसे आणण्याची करीत होता मागणी
याबाबत मिळलेली अधिक माहिती अशी की, चैताली बावा असं महिलेचं नाव आहे. बुधवारी रात्री तिची तिच्याच नवऱ्यानं गळा दाबून हत्या केलीय. नवरा सुनील बावा हा श्रीनगर येथे लष्करात नोकरी करतो. दहा दिवसांसाठी सुनील बावा हा नाशिकला सुट्टीवर आला होता. चैताली हिच्याकडे वारंवार माहेरूहून पैसे आणण्याचा तो तगादा लावत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आलीय. त्यातूनच हा वाद झाल्यानं सुनील याने गळा दाबत तिची हत्या केल्याची माहिती मिळते आहे.

पत्नीला मारून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न
हत्येनंतर सुनील याने स्वत:ला संपविण्याचाही प्रयत्न केला. चाकूने स्वत:च्या हातावर वार करून घेत नस कापून घेतली होती. पत्नीचा खून केल्यानंतर संशयित आरोपीने कल्याण येथे राहणाऱ्या चुलत भावला फोन केला होता. त्यावेळी भारतीने वहिनी कुठे आहे विचारले असता आरोपी बावा याने ती स्वर्गात गेली असे सांगितले.त्यावेळी चुलत भाऊ असलेल्या भारती याला संशय आल्याने त्याने लागलीच त्या मुलीच्या माहेरी फोन करून माहिती दिली. त्यावरून ही सगळी घटना उघडकीस आली.

दोन वर्षांपूर्वीच चैताली आणि सुनील यांचा विवाह झाला होता. अगदी ते तीन महिन्यांची छोटीशी मुलगी देखील आहे. चैतालीची हत्या केल्याने सुनील बावा या सैनिकांवर म्हसरुळ पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.