निवडूण येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला पक्षाकडून उमेदवारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडीतच आगामी निवडणूका लढवाव्यात यासाठीच आमची चर्चा सुरू आहे. पुणे लोकसभेची जागा कॉंग्रेसलाच मिळेल. जनतेतून निवडूण येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल, असे स्पष्ट करत कॉंग्रेसचे प्रदेशअध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुण्यातील उमेदवारीची चर्चा गुलदस्त्यातच ठेवली. त्याचवेळी भारिपलाही आघाडीत घेण्यासंदर्भात डॉ. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरू असून मनसे आणि एमआयएम हे पक्ष आघाडीत घेणे आम्हाला मान्य नसल्याचे स्पष्टीकरण चव्हाण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिले.

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहर कॉंग्रेसने भवानी पेठेत आयोजित केलेल्या सभेसाठी चव्हाण आज पुण्यात आले होते. सभेपुर्वी त्यांनी कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत वरिल माहिती दिली. कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष रमेश बागवे आणि पक्षाचे नेते माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्यासह वरिष्ठ पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते. केंद्रातील भाजप आणि राज्यातील सत्ताधारी भाजपवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. देशात १४ हजारांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यानंतरही शेतकर्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन अपयशी ठरले आहे.

दूध आणि कांदा उत्पादकांची आंदोलने सुरू असून शेतकर्‍यांच्या मुलींना आत्मत्यागासारखी आंदोलने करावी लागत आहे, हे सरकारचे अपयश आहे. कॉंग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेमुळे शासनाने शेतकर्‍यांची कर्जमाङ्गी केली. परंतू प्रत्यक्षात शेतकर्‍यांना आहे. दुष्काळी परिस्थितीत सुरू करायची रोजगार हमीची कामे, टँकरने पाणी पुरवठा, चारा छावण्या अद्याप सुरू करण्यात आलेल्या नाहीत. मुख्यमंत्री सीएम चषक क्रिकेट स्पर्धेत व्यस्त असून शेतकर्‍यांचा विचार करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीकाही चव्हाण यांनी यावेळी केली.

नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. नव्याने रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. परंतू केवळ निवडणुकांच्या तोंडावर घोषणाबाजी आणि जुमलेबाजी करण्यापलिकडे सरकार काहीच करत नाही, हे या देशाचे दुर्देव आहे. सरकार शेवटच्या घटका मोजत असून विरोधी पक्षातील समविचारी पक्षांना सोबत घेउन आगामी निवडणुकात या सरकारला सत्तेतून घालवू. राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडीची चर्चा सुरू असून आघाडी निश्‍चित होईल.

पुणे लोकसभा मतदार संघाची जागा कॉंग्रेस लढवेल. निवडूण येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा निकष ठरविण्यात आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिपला महाआघाडीमध्ये येण्यासाठी आम्ही प्रस्ताव दिला आहे. एमआयएमने लोकसभा निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. आघाडीमध्ये कुठल्याही निवडणुकांमध्ये एमआयएम आणि मनसेला घेणे आम्हाला मान्य नाही, असेही चव्हाण यांनी नमुद केले.