दिल्लीत आवडीचे गाणे वाजवायला सांगितले म्हणून घातल्या गोळ्या

ADV
नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – घरात मुलीच्या जन्मानंतर तिच्या बारशाच्या कार्यक्रमास पित्याने मोठ्या हौशेने डीजे लावला होता. सर्व जण आनंदाने डीजेच्या तालावर नाचत होते. यावेळी दोघा मुलांनी डीजेला त्यांच्या आवडीचे गाणे लावायला सांगितले. त्यातून वाद सुरु झाल. हा वाद इतका पेटला की तेथे आलेल्या डीजे मालकांनी चक्क दोन्ही मुलांवर गोळ्या झाडल्या. दोघांच्याही पोटात गोळी लागली. यामुळे एका मुलीची किडनी काढावी लागली तर दुसऱ्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे. ही घटना दक्षिण-पश्चिम दिल्लीतील पालम गावात रविवारी रात्री घडली.

या प्रकरणातील तक्रारदार आणि संशयित आरोपी एकाच कुटुंबातील आहेत. यामध्ये दोन्ही कुटुंबात भांडण झाले. एक पाहुणा डीजेचे काम करतो. गोळी झाडल्याप्रकरणी आशू आणि अमित यांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त देवेंद्र आर्य यांनी सांगितले. त्यांचा भाऊ संजयचा शोध घेतला जात आहे. जखमींमध्ये २५ वर्षीय शेंकी आणि १६ वर्षीय तुषारचा समावेश आहे.

शेंकीचे वडील राजेंद्र यांनी सांगितले की,आमचे काका नरेश यांच्या घरात कार्यक्रम होता. तुषार हा त्यांचा भाऊ बिजेद्र यांचा मुलगा आहे. शेंकी आणि तुषार रात्री कार्यक्रमात सहभागी झाले. गाणे लावण्यावरुन डीजेबरोबर त्यांचा वाद झाला. हे प्रकरण नंतर वाढले. डीजे वाजवणाऱ्याने आपल्या मालकाला बोलावले. त्यानंतर मालकाने आपल्या दोन भावांना बोलावले. प्रकरण इतके टोकाला गेले की, डीजे मालकाने तीन राऊंड गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या शेंकी आणि तुषारला लागल्या. दोघांच्या पोटात गोळी लागली. तिसरी गोळी भिंतीला लागली.

ADV

जखमी अवस्थेत या दोघांना सेक्टर १८ द्वारका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुषारची एक किडनी काढण्यात आली असून शेंकी सोमवारी सकाळी १० वाजता शुद्धीवर आला. त्याच्या पोटातून अद्याप गोळी काढण्यात आलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.