नाशिकचे नितीन भालेराव छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी केलेल्या IED हल्ल्यात शहीद

रायपूर : पोलीसनामा ऑनलाईन – छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी कोब्रा 206 बटालियनवर आयईडीने केलेल्या हल्ल्यात नाशिकचे सुपुत्र असिस्टंट कमांडेंट नितीन भालेराव यांना वीरमरण आले आहे. तर केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (सीआरपीएफ) 9 जवान जखमी झाले आहेत. शनिवारी (दि. 27) रात्री 10 च्या सुमारास ताडमेटला परिसरातल्या बुर्कापालपासून 6 किलोमीटर अंतरावर सीआरपीएफचे जवान नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. त्यावेळी नक्षलवाद्यांनी हा आयईडी स्फोट घडवून आणला.

सुकमाचे पोलीस अधीक्षक के. एल. ध्रुव यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी रायपूरला आणण्यात आले आहे. तर असिस्टेंट कमांडेंट नितीन भालेराव यांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच अखेरचा श्वास घेतला.

नितीन भालेराव हे मूळचे नाशिकचे आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरेंनी भालेराव यांच्या कंपनी कमांडरशी संवाद साधला आहे. सध्या भालेराव यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम सुरू आहे. त्यानंतर त्यांचे पार्थिव रायपूरहून विमानाने मुंबईला आणले जाणार आहे. तेथून ते नाशिकला आणण्यात येईल. त्यानंतर त्यांचे नातेवाईक निश्चित करतील, त्या वेळेनुसार त्यांचा अंत्यविधी सरकारी इतमामाने केला जाईल, अशी माहिती मांढरेंनी दिली आहे.

शनिवारी सुरक्षा दलाचे जवान ताडमेटला परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत होते. सर्च ऑपरेशन सुरू असताना रात्री उशिरा काही जवान नक्षलवाद्यांनी तयार केलेल्या स्पाईक होल्समध्ये अडकून जखमी झाले. त्यानंतर काही जवान आयईडी स्फोटात जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.