ड्युटीवर तंबाखू खाणे सहायक पोलीस उप निरीक्षकाला पडले महागात

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी नोकरांना कर्तव्यावर असताना धुम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र, सर्रास या नियमाची पायमल्ली होताना दिसत आहे. मात्र, ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचचली आहेत. कर्तव्य बजावत असताना तंबाखू खाणाऱ्या एका सहायक पोलीस उप निरीक्षकाला तीन हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा दिली आहे. यामुळे कर्तव्य बजावत असाना धुम्रपान करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सुनिल काशिराम कदम असे दंडाची शिक्षा झालेल्या सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. सुनिल कदम हे कळवा वाहतूक उपविभागात कार्यरत आहेत. कदम यांनी कर्तव्य बजावत असताना तंबाखू खाताना आढळून आले होते. कर्तव्यात कसूर केल्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. तसेच त्यांचा अहवाल पोलीस उपायुक्त अमित काळे यांना सादर करण्यात आला होता. पोलीस उपायुक्तांना मिळालेल्या अहवालानुसार कदम हे दोषी आढळल्याने त्यांना तीन हजार रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

सुनिल कदम यांची २९ सप्टेंबर रोजी कळवा येथील शिवाजी चौकात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. या ठिकाणी शासकीय गणवेशात कर्तव्यावर असताना ते तंबाखू खात असताना आढळले होते. या प्रकरणी त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. कदम यांनी आपल्या कारणे दाखाव नोटीसमध्ये केलेला खुलासा हा खोटा असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना तीन हजार रुपयाचा दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.