संतप्त मराठा समाजाकडून खा.चंद्रकांत खैरे यांना धक्काबुक्की….

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदेंच्या पार्थिवावर आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. पण त्या दरम्यान अंत्यसंस्काराकरिता आलेल्या शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच खैरे यांना धक्का बुक्की करीत घटनास्थळावरून घालवण्यात आले. दरम्यान औरंगाबाद येथील कायगावात काकासाहेब शिंदे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काकासाहेब शिंदे यांचा लहान भाऊ अविनाश शिंदे यांनी अग्नी दिला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच्या आंदोलनादरम्यान औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाचा गोदावरी नदीत पडून मृत्यू झाला. या घटनेच्या निषेधासाठी मराठा क्रांती मोर्चाने आज २४ जुलैला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही घोषणा केली. मृत्यू झालेल्या काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करुन त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत मेगाभरती रोखावी, स्थानिक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांनी केल्या आहेत.काकासाहेब शिंदेंच्या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा संघटनांनी केली आहे.

[amazon_link asins=’B07CYX78FJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e8a2c18c-8f0c-11e8-a592-a348730336f9′]

बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन

अत्यावश्यक सेवा बंदमधून वगळण्यात आल्या आहेत. वारकरी पंढरपूरहून परत येत आहेत, त्यामुळे बस अडवू नका, बसचं नुकसान करु नये, असे आवाहन सुद्धा मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे. तसेच, प्रशासनासह सर्व पक्षीय नेते आणि मराठा मोर्चा समन्वयकांनी आंदोलकांना शांत राहण्याचं आणि असं टोकाचं पाऊन न उचलण्याचं आवाहन केलं आहे.

आज मुंबईत बैठक

मुंबई येथे महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज बैठक आयोजित करण्यात आली आहे. मराठा मोर्चा समन्वयकांची शिवाजी मंदिर येथे दुपारी २. ३० वाजता बैठक होणार आहे. आज बैठकीनंतर मराठा मोर्चाचे समन्वयक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.

नंदुरबार – शहादा शहरात कडकडीत बंद. कोणत्याही प्रकारची सूचना न देता बंद पुकारला. सुरु असलेली दुकाने बंद करण्यासाठी सकल मराठा मोर्चाचे कार्यकर्ते रस्त्यावर. दुपारी 1 वाजता महामार्गावर चक्का जाम करणार.

नाशिकहून औरंगाबादला जाणारी बससेवा बंद, एस टी महामंडळचा निर्णय, येवलापर्यंतच बस जाणार, नाशिक -पंढरपूर बस संगमनेर जवळ अज्ञातांनी जाळण्याचा प्रयत्न केल्यानं खबरदारीचा उपाय, महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेण्यात आला आहे.