आदिवासी ग्रामस्थांचा सुरक्षा दलाच्या जवांनावर हल्ला, २० जवान जखमी

अकोट (अकोला) :  पोलीसनामा ऑनलाईन – पुनर्वसित गावांमध्ये शासनाकडून उपेक्षा झाल्याने पुन्हा मेळघाटातील मुळ गावांमध्ये परतणाऱ्या आदीवासी ग्रामस्थ व सुरक्षा दलांमध्ये मंगळवारी (दि.२२) दुपारी संघर्ष झाल्याची घटना घडली आहे. मेळघाटातील केलपानी, गुल्लरघाट परिसरात हा सशस्त्र झाला. गावकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये राज्य पोलिस, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) व वनविभागाचे जवळपास २० जवान जखमी झाले तर १० ते १५ आदिवासी बांधव जखमी झाल्याची माहिती आहे. हा परिसर हा दुर्गम असल्याने नेमके चित्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.

पुनर्वसित अमोणा, बारुखेडा, धारगड, सोमठाणा बु., सोमठाणा खु., गुल्लरघाट, केलपाणी, नागरतास या गावांतील ग्रामस्थांनी काही मागण्या केल्या होत्या. मात्र या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने १५ जानेवारी रोजी मेळघाटमधील जुन्या गावात परतले. तेव्हापासून या परिसराला वन व पोलीस विभागाच्या छावणीचे स्वरूप आले आहे. गावकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने त्यांना समजावून बाहेर काढण्याकरिता प्रशासन व आदीवासी ग्रामस्थांमध्ये चर्चा झाली. परंतु, चर्चा फिस्कटल्यामुळे आदीवासी ग्रामस्थ गुल्लरघाट परिसरात कुटुंबासह ठाण मांडून आहेत.

दरम्यान, आज (मंगळवारी) दुपारी पोलिस, एसआरपीएफ व वनविभागाचे कर्मचारी आदिवासी ग्रामस्थांना त्यांच्या गावात परत पाठविण्यासाठी आले असता. त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर आदीवासी ग्रामस्थांनी दगड, तिर कमठा, गोफण, काठ्या व मिरची पावडरने सुरक्षा दलाच्या जवांनावर हल्ला केला. शेकडो ग्रामस्थांनी अचानक चढविलेल्या हल्ल्यामुळे गांगारुन गेलेल्या सुरक्षा दलाच्या जवानांनीही त्यांच्यावर हल्ला केला. यामध्ये सुरक्षा दलाचे जवळपास २० जवान जखमी झाले. तर १० ते १५ आदिवासी जखमी झाले. जखमी जवानांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सशस्त्र संघर्षानंतर गुल्लरघाट परिसरात तणावपूर्ण परिस्थिती असून, अमरावती येथील पोलिसांची अतिरिक्त कुमक घटनास्थळावर दाखल झाली आहे. पोलीस व वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आले आहेत.