बंदुकीचा धाक दाखवून दोघांवर हल्‍ला

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड येथील बायपास रोडवरील  झाल्टा फाट्यावर बंदुकीचा धाक दाखवून दोघांवर हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत संदीप शिंदे आणि पियुष पाखरे हे दोघेजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, संदीप शिंदे आणि पियुष पाखरे हे मंगळवारी रात्री दिड वाजण्याच्या सुमारास बीड बायपासवरील झाल्टा फाट्यावरून जात होते. तेव्हाच तेथे पांढऱ्या रंगाची फॉर्च्यूनर गाडी आली या गाडीचा क्रमांक ( mh 20- 2121) होता. या गाडीतील काही जणांनी बंदुकीचा धाक दाखवत शिंदे आणि पाखरे यांना आडवून थेट त्यांच्यावर हल्ला केला. विशेष म्हणजे हल्ला करणाऱ्यांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा देखील समावेश होता.

या हल्ल्यानंतर जखमी शिंदे आणि पाखरे यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.