Dighi News : पोलीस कर्मचार्‍याचा पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न

दिघी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस उपनिरीक्षक महिलेसोबत पोलीस शिपायाचे प्रेमसंबंध असताना झालेल्या वादातून पोलीस शिपायाने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना दिघी पोलीस ठाण्यात 1 जानेवारी 2021 रोजी रात्री पावणेअकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तब्बल 18 दिवसांनी पोलीस शिपायावर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस शिपाई अनिल संपत निरवणे असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अशोक भागवत तरंगे यांनी दिघी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.18) रात्री नऊच्या सुमारास फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नरवणे हे दिघी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांचे दिघी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिक्षक महिलेसोबत मागील दीड वर्षापासून प्रेमसंबंध होते.

दरम्यान, दोघांमध्ये वाद झाले. याच रागातून नरवणे यांनी संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षकास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच स्वत:च्या जीवाचे बरेवाईट करुन घेण्याची धमकी दिली. त्यानंतर पोलीस शिपाई नरवणे याने पोलीस स्टेशनच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घटना घडल्यानंतर 18 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्यास एवढा उशीर का झाला याची माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास दिघी पोलीस करीत आहेत.