‘न्यूज’ चॅनेलची बातमी असल्याचे भासवित कोंढव्यात ‘विद्यमान’ नगरसेवकाची बदनामी करण्याचा प्रयत्न

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन –  वेगवेगळ्या न्यूज चॅनेलचे सध्या उदंड पीक आले आहे. त्याचा गैरफायदा घेत एखाद्या न्यूज चॅनेलची बातमी असल्याचे भासवित कोंढव्यात विद्यमान नगरसेवकाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

याप्रकरणी ऑल कोंढवा सोशल फाउंडेशन संस्थापक हाजी फिरोज हसन शेख यांनी कोंंढवा पोलिसांकडे तक्रार केली आहे. या अर्जात शेख यांनी म्हटले आहे की, काही दिवसांपूर्वी पुणे मनपाच्या कोंढवा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका भ्रष्टाचार करीत आहेत, पुण्यातील काही नगरसेवक झाले बिल्डरांचे दलाल व पतीच्या सहाय्याने भरत आहेत बिल्डरांचे खिसे, असा ३ मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.

हा व्हिडिओ गगन एमरॉल्ड सोसायटीमध्ये घेतलेला दिसून येत आहे. तसेच व्हिडिओमध्ये गगन एमरॉल्ड सोसायटीचे चेअरमन हनिफ शेख, अख्तर पीरजादे, समीर मुलानी, नसरीन माला व शरिफा असे सोसायटीच्या जागेबद्दल चा वाद असल्याचे बोलताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर या सोसायटीच्या जागेचा व माझा तसेच माझे पत्नीचा कधीही कुठलाही संंबंध नसताना आमची समाजामध्ये प्रतिमा मलिन करण्याचे उद्देशाने हे षडयंत्र कोणीतरी रचले असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ नीट पाहिला असता कोणीतरी हा व्हिडिओ समाजामध्ये आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी खोटे न्यूज चॅनेल तयार करुन त्यावर खोटी बातमी प्रसारित केली. त्यानंतर ती खोटा न्यूज चॅनेलसारखा दिसणारा व्हिडिओ व्हायरल करुन आमची बदनामी केली, असे हाजी फिरोज शेख यांनी त्यांच्या अर्जात म्हटले आहे.

दरम्यान, एक महिना उलटून गेला तरी ही गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई होत आहे. पोलीस आयुक्त यांनी कोणत्याही तक्रारी अर्जावर सात दिवसात कोणती कारवाई केली असे आदेश देऊनही लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या अर्जावर कोणती ही कारवाई होताना दिसत नाही. अशी नागरिकांमधून चर्चा आहे. एखाद्या न्यूज चॅनेलसारखी बातमी तयार करुन तो व्हिडिओ व्हायरल करुन लोकांची बदनामी करण्याचा हा नवा प्रकार समोर आला आहे.