Navi Mumbai News : विनयभंगाच्या खोट्या तक्रारीमुळे एकाचा पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्याविरोधात विनयभंगाची खोटी तक्रार दाखल झाल्याने एका व्यक्तीने सीबीडी येथील पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. गुरुवारी (दि. 21) संध्याकाळी ही घटना घडली. परंतु पोलिसांनी त्याला वेळीच ताब्यात घेतले आहे.

घणसोली येथे राहणा-या एका व्यक्तीविरोधात एका महिलेने कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे. सदर व्यक्तीने आपला विनयभंग केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. मात्र आपल्यावर झालेला आरोप खोटा असून राजकीय सूडबुद्धीने तो केला असल्याचा आरोप त्या व्यक्तीने केला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे खोटे गुन्हे दाखल करून बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा सदर व्यक्तीचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची देखील भेट घेतली होती. सदर व्यक्तीने गुरुवारी पोलीस आयुक्तालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केला. सदर व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झालेला नसून केवळ तक्रार अर्ज प्राप्त झाल्याचे पोलिसांनी सांगितले.