सीएसएमटी पुलाचे ऑडिट ऑफिसमधून नाही तर राहत्या घरातून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सीएसएमटी येथील दुर्घटनाग्रस्त पुलाच्या ऑडिटचे काम ज्या दिलीपकुमार देसाईना दिले होते. त्या देसाईकडे त्यांचे स्वत:चे ऑफिसदेखील नाही. त्यांनी या पुलाचे ऑडिट अंधेरीतल्या राहत्या घरातूनच केले आहे. त्यामुळे त्यांनी यापूर्वी केलेल्या कामांची चौकशी करण्याची तसदीदेखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घतेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेच्या ढिसाळ कारभार समोर आल्याने मुंबईकरांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

पालिकेने सीएसएमटी येथील हिमालय या पुलाच्या ऑडिटचे काम दिलीपकुमार यांच्या जेडी कन्सल्टंट या कंपनीला दिले होते. परंतु पालिकेने या कंपनीची कोणत्याही प्रकारची माहिती घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पालिकेने या कंपनीच्या मागील कामांचा अनुभवही पाहिला नाही, तरी देखील या कंपनीला ऑडिटचे काम दिल्याने पालिकेच्या कामावर संशय निर्माण झाला आहे.

पुलाच्या ऑडिटचे काम साध्या कंपनीला देऊन जास्तीत जास्त पैसे स्वतःच्या खिशात घालण्याचा प्रयत्न पालिका अधिकाऱ्यांनी केला होता, अशी चर्चादेखील सुरु आहे. पालिकेचा पुलाच्या ऑडिटच्या कामात धांदलपणा आणि बेजबाबदारपणा दिसत आहे. दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील पूल दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर पालिकेचे आयुक्त अजॉय मेहतांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. युनायटेड काँग्रेस अलायन्सने आयुक्तांनी भेट द्यावी यासाठी आंदोलन केले. परंतु आयुक्त पालिकेत नसल्याची माहिती दिली गेली.