ठाकरे सरकारनं बदललं औरंगाबाद विमानतळाचं नाव, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जाणार

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून ‘छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद’ असे करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या संदर्भातील घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सातत्याने विमानतळ नामांतरणाची मागणी लोकप्रतिनिधींकडून होत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेने देखील “धर्मवीर संभाजी राजे भोसले विमानतळ” असं नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची परवानगी घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे.

यापूर्वी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ, मुंबई’ तसेच कोल्हापूर विमानतळाचे नाव ‘छत्रपती राजाराम महाराज विमानतळ’ असं करण्यात आलं आहे. याच धर्तीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

भाजपनेही महाविकास आघाडीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी औरंगाबाद विमातळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ नाव दिल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचे आभार मानले आहेत. तसेच, औरंगाबाद विमानतळाच्या नामांतरणाला जशी मान्यता दिली तसेच आता शहराचं नाव देखील बदललं पाहिजे. त्यावरून पळ काढता येणार नाही असा टोला आशिष शेलार यांनी लावला