औरंगाबादक्राईम स्टोरी

औरंगाबाद : शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणातून आईची 2 मुलांसह तिसऱ्या मजल्यावरुन उडी, 1 वर्षाच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

औरंगाबाद : ऑनलाइन टीम – शेजाऱ्यांसोबत झालेल्या भांडणाच्या रागातून आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एक वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना औरंगाबाद येथील वाळूज औद्योगिक नगरीतील बजाजनगर भागात आज (सोमवार) दुपारी तीनच्या सुमारास घडली.

या घटनेत आई आणि दोन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने शहरातील घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अनिता सतीश आटकर, प्रतिक्षा सतीश आटकर असे गंभीर जखमी झालेल्या माय लेकींची नावे आहेत. तर सोहम सतीश आटकर या एकवर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिता आटकर यांचे शेजारी राहणाऱ्यांसोबत कडाक्याचे भांडण झाले. भांडणादरम्यान शेजाऱ्यांचे काही शब्द तिच्या मनला लागले. यामुळे रागाच्या भरात तिने आपल्या दोन चिमुकल्यांसह इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात तिने आपल्या मुलांसह उडी मारली. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.

दुपारी तीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांना धक्का बसला आहे. महिलेने आपल्या दोन मुलांसह उडी मारल्यानंतर जमिनीवर पडल्याने मोठा आवाज झाला. आवाजामुळे नागिरिक घरातून बाहेर आले. त्यांनी या तिघांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहून तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी नेमके घटनेच्या आधी काय झाले याचा तपास करत आहेत. महिलेचे शेजाऱ्यांसोबत कोणत्या कारणावरुन वाद झाले. तिने आत्महत्या केली की आणखी दुसरं काही कारण होतं, याचा तपास पोलीस करत आहेत.

Back to top button