दुचाकीस्वाराला जबर धडक देणार्‍या मुजोर रिक्षाचालकास अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भांडणाचा राग मनात ठेवून मुजोर रिक्षाचालकाने दुचाकीस्वारास जोरदार धडक देवून धूम ठोकली. याबाबतचा थरारक व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिसांनी रिक्षाचालकास अटक केली आहे. घाटकोपर मानखुर्द लिंक रोड येथील ईस्टर्न फ्रीवे ब्रिजखाली ही थरारक बदला घेणारी 17 डिसेंबर रोजी दुपारी घडली होती. याबाबत आज देवनार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

या प्रकरणी किशोर काशिनाथ कर्डक (42 रा. घाटकोपर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुजोर रिक्षाचालकावर भा.दं. वि. कलम 307, 279, 336 आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ (अ) (ब) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर काशिनाथ कर्डक (42) हे घाटकोपर येथे राहणारे असून मार्क्सवादी लेनन वादी पक्ष (लाल बावटा) या पक्षाचे मुंबई सचिव आहेत. त्यांच्या पायावरून रिक्षाचालकाने ऑटो रिक्षा (एम एच 03 डीसी 73 37) नेली होती. याबाबत किशोर यांनी जाब विचारला असता या घटनेचा राग मनात ठेवून आरोपी रिक्षाचालकाने त्याच्या ताब्यातील ऑटोरिक्षा बेदरकारपणे तसेच जाणीवपूर्वक वेडीवाकडी चालवून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने किशोर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर तेथून तो पळून गेला. घटनेचा व्हिडिओ व्हारल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे.