राज्यातील आणखी पाच महाविद्यालये ऑटोनॉमस 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील आणखी पाच महाविद्यालयांना राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानकडून स्वायत्त (ऑटोनॉमस) दर्जा मिळाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण स्वायत्त महाविद्यालयांची संख्या ७४ झाली आहेत.

शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासह जागतिकीकरणाच्या वेगाबरोबर रोजगाराभिमुख नवनवीन अभ्यासक्रम, संशोधन व विकास आणि नवीन उपक्रम राबविण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता देण्याचे राज्य सरकारने धोरण अमलात आणले आहे. त्यानुसार पोदार कॉलेज मुंबई, प्रताप कॉलेज अमळनेर, सोशल वर्क कॉलेज मुंबई, एम एम शाह कॉलेज मुंबई , तिरपुडे कॉलेज नागपूर या पाच विद्यालयांना स्वायत्त दर्जा प्राप्त झाला आहे. यापैकी तीन महाविद्यालये ही मुंबईतील असून मुंबईतील स्वायत्त विद्यालयांची संख्या आता २३ झाली आहे.

स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यालयाचे अधिकार
स्वायत्त दर्जा मिळालेल्या विद्यापीठ आणि महाविद्यालयांना (विद्यापीठ अनुदान आयोग) यूजीसीच्या परवानगी शिवाय मोठे निर्णय घेता येणार आहेत. तसेच विद्यापीठांवर यूजीसीचंच नियंत्रण असेल. मात्र त्यांना नवा अभ्यासक्रम, नवा कोर्स, नवा विभाग सुरु करण्यासाठी यूजीसीच्या परवानगीची गरज नसेल.

विद्यापीठांना कार्यक्षेत्राबाहेर विविध अभ्यास केंद्र, रिसर्च पार्क, परदेशी विद्यार्थ्यांना थेट प्रवेश आणि परदेशी तज्ज्ञ शिक्षकांची नियुक्तीही करता येईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही विद्यापीठं तज्ज्ञ शिक्षकांना आकर्षित करण्यासाठी सातव्या वेतन आयोगापेक्षाही जास्त पगार देऊ शकतील. ही विद्यापीठं जगभरातील विद्यापीठांशी शैक्षणिक करार करु शकतात.