तोंडाची स्वच्छता न राखल्यास वाढतो हार्ट अटॅकचा धोका

पोलीसनामा ऑनलाइन – होय, तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता नियमित न ठेवल्यास हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे एका संशोधनाच्या आधाराने शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. नियमितपणे तोंडाची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. दररोज दिवसात किमान दोनवेळा ब्रश करणे, तसेच जिभेची स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. जे लोक ओरल हेल्थ म्हणजेच तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेत नाहीत, त्यांना ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅकचा धोका अधिक वाढतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

फिनलॅन्डच्या टेम्पिअर यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनानुसार तोंडात आढळणारे बॅक्टेरिया फार घातक असतात. हे बॅक्टेरिया धमन्यांमध्ये रक्त गोठवतात. यामुळे शरीरातील इतर अवयवांना व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही. या बॅक्टेरियांनी मेंदूच्या धमण्या किंवा हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लड क्लॉटिंग (गोठलेले रक्त) केल्यास व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक होऊ शकतो.
संशोधकांनी या शोधासाठी स्ट्रोकवर उपचार घेणाऱ्या ७५ रूग्णांवर अभ्यास केला. त्यांच्या रक्ताची तपासणी केली असता त्या रूग्णांमध्ये ब्लड क्लॉट्स आढळून आले.

या रक्तांच्या गाठींमध्ये ७९ टक्के असे डीएनए आढळले, जे तोंडातील बॅक्टेरियापासून तयार होतात. याच रूग्णांच्या शरीराच्या दुसऱ्या भागात आढळणाऱ्या रक्तात हे बॅक्टेरिया फार कमी प्रमाणात आढळले. यामुळे शोधातून हा निष्कर्ष निघतो की, तोंडात तयार होणारे बॅक्टेरियांमुळे हार्ट अटॅक आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो.कार्डिओवक्सुलर रोगांमध्ये बॅक्टेरियाची काय भूमिका असते, याव टेम्पिअर यूनिव्हर्सिटीचे अभ्यासक १० वर्षांपासून अभ्यास करत होते. या संशोधनातून असे दिसून आले की, तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता न करणे आणि तोंडात बॅक्टेकिया वाढल्याने हार्ट अटॅकचा धोका असतो. तसेच या बॅक्टेरियांमुळे डीप वेन थ्रोम्बोसिस (पायांच्या धमण्यांमध्ये रक्ताच्या गाठी होणे) होऊ शकतो.