‘नवाब मलिक यांनी ऑनलाइन बकरा खरेदी केला का ?’ भाजप नेत्याचा खोचक सवाल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व सण-उत्सव साधे पणाने साजरे करावेत असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. 1 ऑगस्ट रोजी होत असलेल्या बकरी ईद देखील साधे पणाने साजरी करावी. तसेच बकरे ऑनलाइन खरेदी करावे असे राज्य सरकारने सांगितले आहे. बकरे ऑनलाईन खरेदीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापत असल्याचे दिसून येत आहे. औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी बकरे ऑनलाईन खरेदी -विक्रीला विरोध केल्यानंतर आता भाजपच्या नेत्यांनी देखील सरकारवर टीका केली आहे.

बकरी ईदपूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्याचे मंत्री खोटं बोलत असून मुस्लिम समाजाला मूर्ख बनवत असल्याचा आरोप भाजप नेते आणि महाराष्ट्र खाटीक समाजाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी केला आहे. त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी कुर्बानीसाठी ऑनलाईन बकरा खरेदी करण्याचं मुस्लीम बांधवांना आवाहन केलं होते. याच मुद्यावरून आता हाजी अराफत शेख यांनी टीका केली आहे.

नवाब मलिक आणि अस्लम शेख यांनी स्वत: तरी ऑनलाईन बकरे खरेदी केले आहेत का ? कुर्बानीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची शहानिशा ऑनलाइन कशी केली जाणार ? याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल त्यांनी विचारला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना बकऱ्याच्या कुर्बानीविषयी कोणतीही माहिती न देता परस्पर निर्णय घेतला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ऑनलाइन बकरा खरेदीचा निर्णय घेताना खाटीक समाजाला विश्वासात घेतलं नाही. ही सरळ मुस्लीम बांधवांची फसवणूक आहे, अशी टीका त्यांनी नवाब मलीक यांच्यावर केली आहे.